पुणे - विवाह समारंभात अवाढव्य खर्च केला जातो. एवढेच नाही तर अनेक जण नेते मंडळींना आमंत्रित करून दिखावा करतात. विवाहात नगरसेवकापासून ते मंत्र्यांपर्यंत थाटात त्यांचा सत्कार केला जातो. मात्र, येथील एका विवाहसोहळ्यात देशसेवेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांचा सत्कार करून अनोखा संदेश देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये धनेश्वर भोस या निवृत्त जवानाने कारगिल युद्ध आणि पाकिस्तानच्या कुरापतीमध्ये जखमी झालेल्या (दिव्यांग) जवानांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. त्यामुळे या विवाह सोहळ्याला देशभक्तीचा रंग चढला होता.
सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रियांका आणि वैभवचा विवाह होता. विवाहामध्ये 10 निवृत्त जखमी जवानांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. निवृत्त जवान धनेश्वर हे एका पायाने दिव्यांग आहेत. कारगील युद्धात शत्रूशी दोन हात करताना भू-सुरुंग स्फोट होऊन ते गंभीर जखमी झाले. यात त्यांचा उजवा पाय निकामी झाला होता. माजी सैनिक असल्याने त्यांनी पुढारी आणि नेत्यांना न बोलावता युद्धात आणि पाकिस्तानने केलेल्या कुरापतीमध्ये जखमी झालेल्या जवानांना आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात बोलवून त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी उपस्थित नातेवाईकांच्या गालावर तिरंगी झेंड्यांचा रंगीत पट्टाही लावण्यात आला. त्यामुळे या विवाह सोहळ्याला देशभक्तीचा रंग पहायला मिळाला.
हेही वाचा -पुण्यातील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे आंदोलन; मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप