पुणे - जिल्ह्यातील पवना नदी ही पिंपरी-चिंचवड शहरासाठी जिवनदायिनी आहे. परंतु मागील काही वर्षांपासून पवना नदी प्रदुषणाच्या विळख्यात आहे. त्यामुळेच शहरातील काही डॉक्टर आणि शासकीय कर्मचारी यांनी एकत्र येऊन नदी स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे.
श्वास कोंडलेल्या 'पवने'ला नागरिकांच्या मदतीचा हात
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीत अनेक ठिकाणी जलपर्णींचा विळखा आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पालिकेकडून अपेक्षेप्रमाणे कामे होत नाहित. यामुळेच शहरातील काही उच्च शिक्षित नागरिकांकडून एकत्र येऊन नदी स्वच्छ करण्याचा वसा घेतला आहे.
नदीत साचलेली घाण, जलपर्णी यामुळे नदीतील जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून नदी स्वच्छ करायची असा पन या नागरिकांनी केला आहे. दररोज सकाळी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम केल्यानंतर हे सर्वजण आपल्या नोकरीवर जातात. हे नागरिक उच्चशिक्षित असून यातील काहीजण डॉक्टर तर काही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी आहेत. पवना नदीने मोकळा श्वास घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या या कामाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.