पुणे- 'लॉकडाऊनमुळे वाईन शॉप बंद असून व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना व्यसन करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये आभास होण्याचे प्रकार वाढले असून त्यांच्यामध्ये 'विड्रॉल सिम्प्टम्स'ही दिसून येत आहेत. केवळ पुण्यातून नाही तर राज्याच्या विविध भागांतून यासंदर्भात व्यसनमुक्ती केंद्रांकडे फोन येत असून मदतीसाठी याचना केली जात आहे.
'इंटरनेटचा अतिवापर घातक, 'विड्रॉल सिम्पटम्स'चा धोका' 'लॉकडाऊन'मुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. तसेच शाळांनादेखील सुट्या आहेत. त्यामुळे मुले आणि पालक एकत्र घरी आहेत. त्यात लहान मुलांची पालकांच्या ऑफिसच्या कामत लुडबूड नको, म्हणून पालक मुलांच्या हातात मोबाइल देऊन त्यांचे लक्ष गुंतविण्याचा प्रयत्न करतात.
काही दिवसांनी किंवा महिन्यांनी हे दिवस बदलणार असून पालकांना नेहमीप्रमाणे ऑफिसला जावे लागेल. त्यावेळी मुलांना मोबाईल मिळाला नाही, तर त्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना या काळात मोबाइलची सवय लावू नये. तसेच, त्यांच्या विरंगुळ्यासाठी अन्य गोष्टींची तरतूद करावी, असे आवाहन आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे डॉ. अजय दुधाने यांनी केले आहे.
लॉकडाऊनचा वापर घरच्यांनी चांगल्या पद्धतीने करायला हवा. सतत मोबाईल वापरण्याची सवय लागल्यास त्याचा गंभीर परिणाम मुलांवर होईल व एका नव्या आजाराला सामोरे जावे लागणार असल्याची भीती डॉ. अजय दुधाने यांनी व्यक्त केली आहे.