पुणे :लॉकडाऊन संपवून अनलॉक फेज सुरू झाला आहे. मात्र, अजूनही सर्व व्यवसाय सुरू झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने सर्व व्यवसाय सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वारंवार पुढे येत आहे. त्याच संदर्भात पुण्यातील बालकलाकार सह्याद्री मळेगावकर हिने एक व्हिडिओ करून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच साकडे घातले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्याच्या बालगायीकेचे मुख्यमंत्र्यांना साकडे लॉकडाऊनमुळे लोककलावंतांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. या काळात कार्यक्रम होत नसल्यामुळे या लोककलावंतांवर बिगारी काम करण्याची वेळ आली आहे. या कलावंतांचे सध्या खूप हाल सुरू आहेत. कुणी रिक्षा चालवतोय कुणी सुरक्षा रक्षकाची नोकरी करतोय तर अनेकजण भाजीपाला विकून आपली उपजीविका भागवत आहेत. त्यामुळे कलावंताचे होणारे हाल थांबवण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सह्याद्री हिने केली.
सह्याद्रीचे पालक कलाकार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळालेल्या पैशातून त्यांची गुजराण होते. मात्र, अनलॉक फेजमध्ये जाहीर कार्यक्रमांना अजून तरी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यात काहींनी त्यांना लॉकडाऊनच्या काळात मदत केली होती. मात्र, ती अपुरी ठरली होती. अशावेळी सर्वच कलाकारांची व्यथा तिने आर्त शब्दात मांडली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी कलाकारांनीही शेअर केला आहे. कोरोनावर अजून लस आलेली नाही, त्यामुळे फिजिकल डिस्टन्स पाळण्याशिवाय पर्याय नाही. जाहीर कार्यक्रमात त्याची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याने अजून तरी सरकारने परवानगी दिलेली नाही. मात्र, इतर व्यवसायांना परवानगी मिळत असेल तर आता कार्यक्रमांना परवानगी अशी विचारणा कलाकारांकडून होत आहे.
हेही वाचा -यंदाचा गणेशोत्सव ढोल ताशांविनाच.. कोरोनाच्या विळख्यातून भक्तांना सोडवण्याचे बाप्पाला साकडे