पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विद्यार्थी आंदोलन करत असताना मी थेट त्यांच्याशी बोलायचो. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सरकारही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे. सरकारने एमपीएससी आयोगालाही विनंती केली होती. आज विद्यार्थ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय : विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात काही लोक राजकारण आणत होते. याला राजकीय रंग देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. महाविकास आघाडीच्या काळात हा निर्णय घेण्यात आला. पण ते आमच्या सरकारशी हा निर्णय जोडला जात होता. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. हा निर्णय कोणाच्या भेटीतून किंवा बैठकीतून झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी होती ती लक्षात घेऊन आम्ही तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला. आज आयोगानेही त्यांचा निर्णय मान्य केला आहे.
लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे :निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत. पण निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्याला स्वतंत्र अधिकार आहेत. त्यातून घेतलेला निर्णय गुणवत्तेवर घेण्यात आला आहे. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.