पुणे -'राज्य सरकारच्या कल्पनाशक्तीबद्दल कमाल वाटते. रोज नवीन काहीतरी बाहेर काढत आहेत, पण कशाचाच शोध लावत नाहीत. राज्य सरकारच्या कल्पनाशक्तीचा विलास सुरू आहे' असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
राज्य सरकारच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटतेय
राज्य सरकार कधी फोन टॅपिंग तर कधी कोरेगाव भीमा दंगलीत देवेंद्र फडणवीस यांचा हात होता, असा रोज कल्पनाशक्तीचा विलास सुरू आहे. अजून काही यादी असेल तर तीही काढा, या सर्वांची चौकशी करा असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने चौकशी करणे हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे फक्त आरोप करणे चुकीचे आहे. हळूहळू लोक आता या बातम्या वाचणेच बंद करतील असेही पाटील म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासंदर्भात कॅगने ठपका ठेवला तर चौकशी करा. पण स्मारकाचे कामकाज लांबवू नका. चौकशी करा, अहवाल आणा, वातावरण बिघडवू नका, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, असेही पाटील म्हणाले.
राज ठाकरेंच्या भूमिकेचा आनंद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला हिंदुत्वाचा पुरस्कार आमच्या दृष्टीने आनंदाचा विषय आहे. कारण निवडणुका, राजकारण यापेक्षा राजकीय क्षेत्रामधून देशाचे परिवर्तन हा भाजपचा ध्यास आहे. देशाच्या परिवर्तनाच्या दृष्टीने राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा पुरस्कार आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. मनसे आणि भाजप एकत्र येईल की नाही ते काळाच्या ओघात ठरेल. त्यासाठी राज ठाकरेंना आधी आपली परप्रांतीयांविषयीची भूमिका बदलावी लागेल, असेही चंद्रकांत पाटील.