पुणे: काल भाजप नेत्या स्मृती ईराणी पुणे दौऱ्यावर असताना महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बालगंधर्व येथे स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. तेव्हा भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्या महिला आंदोलक वैशाली नागवडे यांच्या कानशिलात मारल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आता आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ट्वीट च्या माध्यमातुन टीका केली होती ते म्हणाले होते की, 'चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल, अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करीत असाल, तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारे आहे'.