पुणे -सावरकरांना समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना राहूच कशी शकते? सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारावी, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्याला भेट देऊन सावित्रीबाईंच्या स्मारकाला वंदन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सत्तेसाठी उद्धव ठाकरे किती लाचार होणार
एकनाथ खडसे यांची केंद्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माझ्याशी भेट झाली आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. शिवसेनेकडे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि हुशार नेत्याला देण्यासाठी काहीच नाही, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा - एकनाथ खडसेंची नाराजी कायम; फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ
कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळाली त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपला अपयश आले. एकट्या भाजपला हरवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावे लागले. सोलापूर आणि सांगलीमध्ये आम्ही विजयी झालो हेही लक्षात घ्या, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामध्ये सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात समलैंगिक संबंध होते, असा उल्लेख आहे. ही खूप निंदनीय बाब असून रस्त्यावर उतरून याचा निषेध करणार आहोत. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
सत्तेसाठी शिवसेना आपल्या मूल्यांशी तडजोड करत आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीही पडलेले नाही. उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री झाले. मुलगा मंत्री झाला त्यामुळे त्यांना आता काही घेणे-देणे नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.