पुणे :कसबा पोटनिवडणुकीतील घडामोडी मतदान झाल्यावर देखील सुरू आहेत. भाजप नेते गणेश बिडकर यांच्यावर मारहाण प्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी कडे भाजप उमेदवार हेमंत रासने, तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर देखील आत्ता पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही आचारसंहितेचा भंग केला आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर देखील गोपिनियतेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक मतदानात काल (रविवारी) भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केले होते. याप्रकरणी रासने यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केलेल्या रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. असे म्हणत रुपाली पाटील यांनी हेमंत रासने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या केली होती.
रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हादाखल : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी गुन्हा केला तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर देखील विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धंगेकर यांनी प्रचार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण केले होते आणि यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्याबरोबर कार्यकर्ते उपस्थित होते, हे आचारसंहितेचभंग असल्याकारणाने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदान करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल : तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी काल मतदानाच्या दिवशी मतदान करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा देखील गोपनीयतेचा भंग असल्याच्या कारणाने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबा पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत महाविकास आघाडी असेल किंवा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष असेल यांच्यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप अजूनही सुरू असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. काल भाजप नेते गणेश बिडकर यांच्यावर देखील रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कसबा निवडणूक रंगीत झाली आहे.
हेही वाचा :Protest For Police Inspector Suspension: पोलीस निरीक्षकांच्या निलंबनासाठी अक्कलकुव्यात रास्ता रोको