दौंड : आषाढी वारीसाठी पंढरपूरला ( Pandharpur for Ashadi Wari ) जाणाऱ्या वारकऱ्यांकडून टोल आकारणी केल्याप्रकरणी ( Toll collection from Warkaris ) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल प्लाझाचे अधिकारी आणि इतर तीन जणांवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा ( Crime against three persons at Yavat police station ) दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
टोलमाफीचे परिपत्रक जारी : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०७/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र शासनाने आषाढी वारीकरिता जाणारे सर्व भाविक तसेच वारकरी यांच्या वाहनांना टोलमाफी केल्याबाबतचे परिपत्रक पारित करण्यात आले होते. त्याबाबतच्या सूचना लेखी व प्रत्यक्ष स्वरूपात यवत पोलिसांनी पाटस टोलनाका येथील अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या होत्या.
चार जणांवर गुन्हा दाखल : यानंतरदेखील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोलनाक्यावर काही वारकऱ्यांना टोल माफ न करता, टोल वसुली करण्यात आली. टोलनाका प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्वतः पाटस टोलनाक्याचे अधीकारी अजयसिंग ठाकुर, सुनिल थोरात व शिफ्ट इन्चार्ज विकास दिवेकर, टोल कर्मचारी बालाजी वाघमोडे यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ५५५/२०२२ भा.द.वि.क. १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू :सदर गुन्ह्याचा तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.