महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 24, 2021, 1:34 PM IST

ETV Bharat / state

बारामतीत कर्मचार्‍यांना दमदाटी; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

बारामती एमआयडीसीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Baramati
बारामती

पुणे (बारामती) - मजूर कामावर घेण्याच्या कारणावरून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या दोघा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बारामतीतील दोन जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास सिताराम धोत्रे व दत्तात्रय बाबुराव मालुसरे (दोघे रा.बारामती), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मजूर कामावर घेण्यासाठी दमदाटी -

या प्रकरणी बाळासाहेब सखाराम जगताप यांनी फिर्याद दिली. गुरुवारी (दि.२१) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. जगताप औद्योगिक विकास महामंडळाच्या सरकारी वाहनावर चालक म्हणून काम करतात. त्यांना आरोपींनी दमदाटी केली. याशिवाय पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या लिक्विडचा पुरवठा करणारे संताजी कदम यांनाही धोत्रेने माझ्याकडील चार मजूर कामाला घ्या, म्हणून दमदाटी केली होती.

शिवीगाळ करत दमदाटी -

गुरुवारी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रामचंद्र जोशी यांना प्रांत कार्यालयात बैठकीसाठी जायचे असल्याने जगताप हे सरकारी वाहन तयार करून कार्यालयाच्या व्हरांड्यात सहकारी विष्णू चंद्रभान मिसाळ यांच्यासह थांबले होते. यावेळी धोत्रे व मालुसरे हे दोघे तिथे आले. धोत्रे याने बाळासाहेब जगताप यांना तुझ्या गावातील लोक ठेकेदाराकडे कामाला लावतो, माझे लोक चालत नाहीत का? असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.

बाहेर भेट तुला जीवेच मारतो -

आरोपींची शिवीगाळ ऐकून कार्यालयातील अधिकारी व्हरांड्यात जमा झाले. ठेकेदाराला सांगून माझे चार मजूर कामाला लावता येत नाहीत का, तुझे कसे लावतो? असे म्हणत धोत्रे याने जगताप यांच्या अंगावर येत शिवीगाळ केली. त्याने जगताप यांचे कपडे पकडून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी उपस्थित असलेल्या विष्णू मिसाळ यांनाही मालुसरे याने 'तू पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम नीट करत नाही. फक्त पगार घेतो, असे म्हणत शिवीगाळ केली. सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details