पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश न पाळणाऱ्या दुकानदारावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. सायंकाळपर्यंत 62 जणांवर ही कारवाई केल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.
बोलताना अपर पोलीस आयुक्त पोकळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानंतर जनजागृती ही करण्यात आली होती. मात्र, काही दुकानदारांनी दुकाने सुरू ठेवली. त्यामुळे त्यांच्यावर भा.दं.वि.च्या कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी अनेक पाऊले प्रशासनामार्फत उचलण्यात आली आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तसे पत्रक ही काढण्यात आले होते. पण, पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड, चिखली आणि एमआयडीसी भोसरी या परिसरातील दुकाने सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून दुकानदारांना आदेशाचे पालन करण्यास सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत दुकाने सुरू ठेवली. अखेर, चिखली येथील 18, देहूरोड येथील 6 आणि एमआयडीसी येथील 4 यांसह पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एकूण 62 दुकानदारांवर भा.दं.वि. कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलीस आयुक्त पोकळे यांनी आहे. जर सुचनेचे पालन न केल्यास कारवाई करावी लागणार असल्याचेही पोकळे यांनी सांगितले.
हेही वाचा -कोरोना व्हायरस : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध साई मंदिर २५ वर्षानंतर प्रथमच बंद