पुणे - खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये विसावलेल्या भिमाशंकर अभयारण्यातील भोरगिरी परिसर 'डोंगरची काळी मैना' म्हणजेच करवंदानी सजलेला आहे. या करवंदांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत.
भिमाशंकर-भोरगिरी परिसरात 'डोंगरची काळी मैना'चे आगमन; पाहा विशेष रिपोर्ट भर उन्हाळ्यातदेखील भोरगिरी भिमाशंकर परिसर हिरवागार दिसत असतो. या काळामध्ये नजर जाईल तिकडे करवंदांनी सजलेली झाडे बघायला मिळतात. डोंगर रानात राहणारे आदिवासी बांधव दिवसभर हे करवंद तोडत असतात. त्यानंतर आपल्या लहान-लहान मुलांच्या साहाय्याने या करवंदाची विक्री करतात. पर्यटकही मोठ्या आवडीने हे करवंद विकत घेतात.
आदिवासींनी करवंदांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले.
करवंद हे काळ्या रंगाचे फळ आरोग्यावर्धक असते. त्यामुळे डॉक्टरही करवंद खाण्याचा सल्ला देत असतात. करवंदाला हिंदीमध्ये 'खट्टा मीठा' या नावाने, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. विशेष राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाने कहर केला आहे. मात्र, या दुष्काळाच्या झळा करवंदाला बसलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा करवंदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याचे येथील आदिवासी सांगतात.