बारामती -राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत जमिनीची सुपिकता तपासण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार, जमिनीचे प्रदुषण थांबावे, जमिनीमध्ये सेंद्रीय खतांच्या माध्यमातून सुपिकता वाढावी आणि रासायनिक खतांचा अनावश्यक वापर कमी व्हावा यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत जिल्ह्यातील ३ लाख ७५ हजार १३४ माती नमुने तपासण्यात आले. तसेच, १२ लाख २६ हजार ५२३ जमिन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेच्या गावनिहाय माहितीच्या आधारे जमिनीचा सुपिकता निर्देशांकही तयार करण्यात आला आहे.
गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलकाचे आनावरण :
तपासणी झालेल्या गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलकाचे अनावरण केल्यामुळे सबंधीत गावातील शेतकऱ्यांना देखील आपल्या गावातील शेतीमध्ये असणारी नैसर्गिक मुलद्रव्यांची माहिती होईल. परिणामी अनावश्यक खतांचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे. या अभियानातंर्गत पुणे जिल्ह्याचा सुपिकता निर्देशांक मध्यम स्वरूपाचा आढळून आला आहे. पुणे जिल्ह्यातील मातीमध्ये नत्र-१.३३, स्फुरद-१.५८ तर, पालाश १.९८ एवढ्या प्रमाणात आढळून आले आहे. सध्या जिल्ह्यातील ज्या गावांची तपासणी झाली आहे. अशा गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक लावण्याचे काम कृषि विभागाच्या वतीने सुरू आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमिनीच्या आरोग्य पत्रिका तयार करण्यात येतात.
जमीनीची सुपिकता तपासण्याची मोहीम, अनावश्यक खते टाळण्यासाठी गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक - पुणे जिल्हा माती तपासणी ब्रेकिंग
पुणे जिल्ह्यात जमीनीची सुपिकता तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच, अनावश्यक खते टाळण्यासाठी गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक लावले आहेत. आजवर जिल्ह्यात ३ लाख ७५ हजार १३४ माती नुमन्यांची तपासणी करण्यात आली आहे. शिवाय, जमिन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्हा यात अग्रेसर आहे. रासायनिक खतांचा वापर टाळणे आणि जमिनीची सुपिकता वाढवणे हा उद्देश आहे.
पुणे जिल्ह्यात १८०८ गावांपैकी ७९३ गावामध्ये फलकांचे अनावरण :
पुणे जिल्ह्यामध्ये २०१५-१६ पासून या अभियानाला सुरूवात झाली. या अभियानार्तंगत मातीतील १२ घटक तपासून शेतकऱ्यांना खत वापराच्या शिफारशी दिल्या जातात. जिल्ह्यात सन २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये पहिल्या टप्प्यात १ हजार ८१३ गावांमध्ये १ लाख ७१ हजार ८०२ माती नमुने तपासण्यात आले. यामध्ये ४ लाख ६१ हजार ५३६ जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. सन २०१७-१८ व २०१८-१९ या दुसऱ्या टप्प्यात १ हजार ८७८ गावांमध्ये १ लाख ९१ हजार ३९० माती नमुने तपासण्यात आले. यामध्ये ७ लाख ५३ हजार ८० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. तर, २०१९-२० या वर्षात पथदर्शी प्रकल्पातंर्गत १३ गावांमध्ये ११ हजार ९४२ नमुने तपासण्यात आले. तसेच, ११ हजार ९४२ जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. या गावांमध्ये ६०१ हेक्टर क्षेत्रावरील मृदा चाचणीवर आधारीत प्रात्यक्षिके व ५२ शेतकरी प्रशिक्षणवर्ग घेण्यात आले. या अंतर्गत आज अखेर पुणे जिल्ह्यात एकूण १८०८ गावांपैकी ७९३ गावांमध्ये जमिन सुपिकता निदेर्शांक फलकांचे अनावरण झाले आहे.
पुणे जिल्हा अग्रेसर :
जमीन सुपिकता निर्देशांक फलक अनावरणात पुणे विभागामध्ये पुणे जिल्हा अग्रेसर आहे. हा फलक गावांमध्ये केवळ प्रदर्शित न करता त्याचे सामुहिक वाचन करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांची बैठक घेतली जाते. याद्वारे जमिन आरोग्य पत्रिकेचे महत्व, रासायनिक खतांचा कमीतकमी व संतुलीत वापर, सेंद्रीय खतांचा वापर, रासायनिक खतांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम आदी बाबींची माहिती सबंधीत गावातील शेतकऱ्यांना व्हावी, असा यामागील उद्देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीनीतील सुक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता समजून येते. तसेच, गावातील मुख्य पिकांसाठी संबंधीत कृषि विद्यापीठांच्या खत शिफारशीद्वारे रासायनिक खतांच्या संतुलीत मात्रा देता येतात.
जिल्ह्यातील प्रति तालुका १० गावांची निवड :
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमिन आरोग्य पत्रिका कार्यक्रम २०२०-२१ साठी पुणे जिल्हयातील प्रति तालुका १० गावांची निवड करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून युरिया या रासायनिक खताचा सर्रास मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. वास्तविक पाहता शेतजमिनीतील मातीच्या नमुन्याची ठराविक कालावधीने तपासणी करून जमीन आरोग्य पत्रिका प्राप्त करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या मुलद्रव्यांची कमतरता आहे ते समजून त्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करता येणे शक्य होईल. नत्र खतासाठी युरियाचा वापर कमी करण्यासाठी सेंद्रीय खते, हिरवळीची खते आदींचा वापर करण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. युरिया हे विद्राव्य खत असल्याने ते पाण्यात विरघळून वाहून जाते. त्यामुळे त्याचा अनावश्यक वापर टाळणे तितकेच महत्वाते आहे. नत्र खतासाठी युरियाचा एकदाच वापर करण्याऐवजी टप्याटप्प्याने वापर (स्प्लीट पद्धत) करावा, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जमिनीची सुपिकता वाढावी आणि टिकावी यासाठी अनावश्यक रासायनिक खतांचा वापर कमी करायला हवा. यासाठी आपल्या शेतामध्ये कोणत्या मुलद्रव्यांची उपलब्धता आहे. हे शेतकऱ्यांना माहिती व्हावे. यासाठी गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक लावण्यात येत आहेत. या फलकाचे वाचण केल्यानंतर शेतकऱ्यांना जमिनीतील मुलद्रव्यांची माहिती होईल. तसेच, अनावश्यक खतांवरील शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. - ज्ञानेश्वर बोथे -(जिल्हा कृषि अधिक्षक, पुणे जिल्हा.)