पुणे -एका तरुणाने फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. समीर एकनाथ भसे (वय-२५), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून संबंधित पोस्ट प्रेमाबद्दल आहे. तसेच त्याने आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वी फेसबुकवर वाढदिवसाचा केक, चॉकलेट आणि अंगठीचे फोटो देखील पोस्ट केले होते. त्यामुळे ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
समीरने 'खर्या प्रेमाचा शेवट सुखद नसतो. कारण खरे प्रेम कधीच संपत नाही, अशा आशयाचा मेसेज फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आपले जीवन संपवले. त्याने फेसबुकवर 'ती' च्या आठवणीत चॉकलेट आणि अंगठीचा फोटो देखील पोस्ट केला आहे. तो रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरून इंदोरीच्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आला. तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्यानंतर त्याने काही क्षणातच पुलावरून थेट इंद्रायणी नदीत उडी घेतली. शेजारी काही अंतरावर मासे पकडणारे व्यक्ती होते. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत समीर हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.