पुणे- दोन्ही राजे भाजपाचे खासदार आहेत. त्यांनी केंद्रात मराठा आरक्षण विषयाचा पाठपुरावा करावा, असे ज्येष्ठ नेते शरद पवार कशाच्या आधारावर म्हणाले, ते त्यांनाच माहीत. मराठा आरक्षणाविषयी पवार साहेबांना काही कळत नाही, असे म्हणायचे धाडस मी करणार नाही. मात्र, आरक्षण हे केंद्रातून आणता येत नाही. ते असे कशाच्या आधारावर असे म्हणतात ते कळत नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
आपण उपाय काय यावर विचार करावा. ज्याप्रमाणे इतर राज्यांमध्ये आरक्षण स्थगिती न मिळता खंडपीठाकडे गेले, तसे महाराष्ट्रात कसे होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे पुढे पाटील म्हणाले. पुण्यात आज खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूक अभियानाला सुरुवात करण्यात आली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.