पुणेBhoi Pratishthan BhauBij:पुण्यातील अग्निशामक केंद्र येथे भोई प्रतिष्ठानच्या वतीनं भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातील भगिनींनी जवानांचं औक्षण करून त्यांच्या कामाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली अन् त्यांच्या कार्याला सलामही केला. 24 तास आपले कर्तव्य बजावणाऱ्या या अग्निशामक दलातील जवानांचा यावेळी गौरवही करण्यात आला.
भोई प्रतिष्ठानची 28 वर्षांची परंपरा:पुण्यातील भोई प्रतिष्ठानकडून अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्याची परंपरा गेल्या 28 वर्षांपासून जोपसली जात आहे. यंदा देखील प्रतिष्ठानच्या वतीनं अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. भोई प्रतिष्ठानच्या वतीनं पुणे शहरातल्या गंजपेठमध्ये असलेल्या मुख्य अग्निशमन केंद्रात जाऊन जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी महिलांकडून जवानांना औक्षण करण्यात आलं.
'या' कारणाने अग्निशमन दलाच्या जवानासोबत भाऊबीज:अग्निशमन दलाचे जवान प्रत्येक संकटामध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करतात. त्यामुळे एक दिवस त्यांचे आभार मानण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. सणाच्या काळात कुटुंबापासून लांब राहून ते आपलं कर्तव्य बजावत असतात. दिवाळीसारख्या सणाला देखील हे जवान आपल्या कुटुंबीयांसोबत नसतात. त्यामुळे गेल्या 28 वर्षांपासून या जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्यात येत आहे.