महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्योतिर्लिंग भीमाशंकरमध्ये श्रावण यात्रेसाठी मंदिर समितीसह प्रशासन सज्ज

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे गेल्या दोन दिवसांपासून श्रावण मासातील यात्रेला सुरुवात झाली असून या ठिकाणी भाविकांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून भक्तांच्या आरोग्य सेवेसाठी औषधोपचार किट तयार केली असून येथे ठीक-ठिकाणी किटच्या माध्यमातून औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे.

By

Published : Aug 4, 2019, 8:26 AM IST

भीमाशंकर श्रावण यात्रा

पुणे - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे गेल्या दोन दिवसांपासून श्रावण मासातील यात्रेला सुरुवात झाली आहे. याठिकाणी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी देवस्थान व इतर शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या असून भाविकांच्या नागरी सुविधांकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी आज रविवारी भीमाशंकर देवस्थान येथे सर्व शासकीय विभागांची बैठक पार पडली.

भीमाशंकर श्रावण यात्रेला सुरुवात, विविध प्रशासकीय यंत्रणा सज्ज


भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग अभयारण्य परिसरात येत असल्याने या ठिकाणी भाविकांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. भीमाशंकर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून धुकेही मोठ्या प्रमाणात असून भाविकांना या ठिकाणाहून प्रवास करावा लागत असतो. त्यामुळे देवस्थानाकडून 10 व एस टी महामंडळाच्या माध्यमातून 20 बस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर, दर्शन बारी या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी मंदिरापासून पाठीमागे तीन ते चार किलोमीटर परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा गार्ड व पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.


मंचर-भीमाशंकर व राजगुरुनगर- भीमाशंकर या ठिकाणी रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, सध्याच्या पावसामुळे मदोशी घाटातील मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी मंचर मार्ग व टोकावडे कारकुडी मार्ग असे दोन मार्ग वापरावेत असे आवाहन यावेळी भीमाशंकर देवस्थान सचिव तथा तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.


तसेच "आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा" असं म्हणत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून भक्तांच्या आरोग्य सेवेसाठी औषधोपचार किट तयार केली आहे. तर, भीमाशंकर येथे ठीक-ठिकाणी किटच्या माध्यमातून औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे.


जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदाच ही आरोग्यसेवा पुरवण्यात आली असून भीमाशंकर देवस्थानच्या सचिव तथा तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details