महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona Effect - भीमाशंकरची यंदाचीही श्रावणी यात्रा रद्द - भीमाशंकरची श्रावणी यात्रा रद्द

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणात होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही रद्द करण्यात आली आहे.

pune
pune

By

Published : Aug 6, 2021, 6:51 PM IST

पुणे - श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणात होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही रद्द करण्यात आली आहे. भाविक, पर्यटकांनी याकडे दुर्लक्ष करून मंदिराकडे येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर शासनाचा आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिवाय, 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून डिंभा व पालखेवाडी येथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन घोडेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी केले आहे.

भीमाशंकरची यंदाचीही श्रावणी यात्रा रद्द

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर

प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रावणी सोमवार यात्रा होते. मात्र, सध्या या यात्रेवर कोरोना संकट आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षीची श्रावणी यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदाही कोरोना संकट आहे. त्यामुळे यावर्षीही भीमाशंकरची श्रावणी यात्र रद्द करण्यात आली आहे.

निर्बंध मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

श्रावण महिन्यात भीमाशंकरकडे भाविक व पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. येथे भाविक-पर्यटक येऊ नयेत यासाठी पालखेवाडी चेकपोस्ट, डिंभे नाका याठिकाणी 24 तास पोलीस तैनात करण्यात आले आहेत. निर्बंध झुगारून आलेल्या भाविक-पर्यटकांवर कारवाई केली जाणार आहे.

यंदा श्रावणात 5 सोमवार

यावर्षी ९ ऑगस्ट ते 6 सष्टेंबर दरम्यान श्रावण महिना येत आहे. यंदा श्रावण महिन्यात ९, १६, २३, ३० ऑगस्ट व ६ सष्टेंबर असे पाच श्रावणी सोमवार आले आहेत. भीमाशंकरमधील श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. श्रावण महिन्यात भीमाशंकरचे दर्शन पवित्र मानले जाते. त्यामुळे पूर्ण एक महिना दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या यात्रेचे नियोजन प्रशासन व भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट करत असते.

इतिहासात पहिल्यांदा भीमाशंकर देवस्थानचे उत्पन्न शून्यावर

कोरोनाचा फटका ज्याप्रमाणे अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्याप्रमाणे मंदिराच्या तिजोरीलाही याची झळ पोहोचली आहे. इतिहासात पहिल्यांदा भीमाशंकर देवस्थानचे उत्पन्न शून्यावर आले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानला कोरोनाचा मोठा फटका बसत असल्याने देवस्थानला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मागील एका वर्षापासून कोरोना संकटामुळे भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येथील दानपेट्या रिकाम्याच राहिल्या आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर मंदिर पाण्यात

भीमाशंकर मंदिर परिसरात यंदा असलेल्या नुतनीकरणाच्या कामांमुळे भीमानदी उगमाचा प्रवाह बंद झाला होता. या बंद झालेल्या प्रवाहामुळे पावसाचे पाणी हे थेट मंदिरात गाभाऱ्यात जाऊन शिवलिंग पाण्याखाली गेले होते. इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर मंदिर पाण्यात बुडाले होते.

हेही वाचा -लवकरच अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक होणार - किरीट सोमैया

ABOUT THE AUTHOR

...view details