पुणे- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, असे असतानाही नागरिकांकडून त्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. बारामती शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बारामतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विरुद्ध लढ्यासाठी कठोर निर्णय घेत बारामतीत ‘भिलवाडा पॅटर्न’ची सुरुवात केली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
बारामतीकरांनी जो लॉक डाऊन चा निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य असून या निर्णयाला आमच्या प्रशासनाचा पूर्ण पाठिंबा राहील. बारामतीकरांनी या आधी वेगवेगळ्या क्षेत्रात विविध पॅटर्न राबवून ते यशस्वी करून दाखविले आहेत. हा नवा पॅटर्न ही बारामतीकर यशस्वी करून दाखवतील व कोरोना विरुद्धची लढाई नक्कीच जिंकतील असा मला विश्वास आहे, असे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले आहेत.
वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून राजस्थानच्या धर्तीवर बारामतीत भिलवाडा पॅटर्ननुसार कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार वॉर्ड निहाय मदत सहायत्ता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत नागरिकांना जीवनावश्यक वस्तु घरपोच करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी आणि अन्य प्रशिक्षित कर्मचारी यांचे सयुक्त पथक निर्माण करून नागरिकांचे घर-टू-घर सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे . सर्वेक्षणात फ्लूची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्या त्या भागातील प्रत्येक नागरिकाची तीनवेळा तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून 161 व 89 पथके तयार करण्यात आली असून त्यांच्यामार्फत कोरोना चा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने कार्य केले जाणार आहेत.