बारामती- बारामती उपविभागातील अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सातत्यपूर्ण कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे उपविभागात अवैध व्यवसाय ब-याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. या अवैध व्यवसायांना त्रासलेल्या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतूक होत असून त्यांचे आभार मानले जात आहेत.
टाळेबंदीच्या काळात उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती उपविभागातील पोलिसांनी दि. २३ मार्च ते २८ जुलै या चार महिन्यांच्या काळात बारामती उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण या ६ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपनीय माहिती मिळवून जुगार, दारू, गुटखा, गांजासह कत्तलखाने वाळू अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करून जवळपास ७०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३२ लाख ४ हजार ४०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बारामती शहर, बारामती तालुका व वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात टाळेबंदी दरम्यान तब्बल २१४ अवैध दारू तर २८ ठिकाणी बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४६१ जणांवर कारवाई केली असून या दोन्ही कारवाईत तब्बल २६ लाख २५ हजार ६९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच प्रकारची कारवाई वालचंदनगर, इंदापूर व भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करुन १४८ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ४ लाख २४ हजार ६०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यासह उपविभागात गांजा, वाळू, कत्तलखाने या अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.