महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षण संस्थेच्या भरती फसवणूक प्रकरणी बारामती पोलिसांची कारवाई - पुणे लेटेस्ट न्युज

याप्रकरणी २८ जून २०२० रोजी मंगलसिंग गारद्या वसावे (नंदूरबार) यांनी फसवणुकीची तक्रार दिली होती. तपासानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

बारामती पोलीस
बारामती पोलीस

By

Published : Mar 24, 2021, 8:59 PM IST

बारामती (पुणे) - शाळेमध्ये शिपाई म्हणून नोकरीला लावतो असे सांगत दोघांची ९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामेश्वरी नितीन जाधव यांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. रामेश्वरी नितीन जाधव ह्या यशोदीप कला-क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आहेत. याप्रकरणी २८ जून २०२० रोजी मंगलसिंग गारद्या वसावे (नंदूरबार) यांनी फसवणुकीची तक्रार दिली होती. तपासानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तक्रारीनुसार संस्थेने २०१२-१३ मध्ये वृत्तपत्रात विविध पदे भरण्यासंबंधी जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून तक्रारदाराने संपर्क केला असता त्यांना बारामतीत बोलाविण्यात आले. बारामती कऱ्हावागज मूकबधीर शाळेवर बोलावून घेतल्यानंतर रामेश्वरी जाधव यांनी 'आमची कऱ्हावागज व बाळू पाटलाचीवाडी येथे शाळा आहे. तेथे तुम्हाला शिपाई पदाची नोकरी देऊ असे सांगत दोघांना ९ लाखांची मागणी केली. त्यानंतर दोन टप्प्यांत ही रक्कम रामेश्वरी यांना देण्यात आली. त्यांनंतर स्वामी समर्थ निवासी मूकबधीर विद्यालय बाळू पाटलाची वाडी येथे शिपाई पदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या दोघांनी त्या ठिकाणी चार वर्षे काम केले. परंतु आरोपींनी त्यांना कसलाही पगार दिला नाही. पगाराबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे तक्रारदाराने या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र संबधित आरोपी अनेक दिवसांपासून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या तांदुळवडी येथील नातेवाईक यांच्या घरातून अटक केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details