महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामती बस स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार, नव्या आराखड्यास प्रशासकीय मंजुरी - baramati bus stand news

बारामती बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठीच्या आराखड्याला मान्यता मिळाली आहे. पुढील काही महिन्यात बारामती बसस्थानक एक आगळ्यावेगळ्या स्वरूपात उभे राहणार आहे.

baramati new bus stand design final
बारामती बस स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार

By

Published : Nov 12, 2020, 3:44 PM IST

बारामती (पुणे) - राज्यात अनेक शहरातील बस स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये बारामती बस स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. बारामतीच्या सर्वांगिण विकासाबरोबरच शहरातील बसस्थानकाबाबत प्रवाशांच्या विविध अपेक्षा लक्षात घेत सर्व सोयीसुविधांनीयुक्त अत्याधुनिक दुमजली बसस्थानक बारामती शहरात लवकरच उभे राहणार आहे.

सर्वाधिक उत्पन्न देणारे बसस्थानक

बारामती बसस्थानक हे पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे बस स्थानक म्हणून ओळखले जाते. या बसस्थानकाचे नूतनीकरण होणार असल्याने या बसस्थानकात विविध अत्याधुनिक सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बारामती बसस्थानक स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रशस्त पार्किंग व अन्य अनुषंगिक सोई-सुविधा मिळाल्या पाहिजेत. या प्रकारचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पवार यांनी दिले होते. त्यानुसार आराखड्याची निर्मिती करण्यात आली आहे. आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बारामती बसस्थानक एका आगळ्यावेगळ्या स्वरुपात उभे राहणार आहे.

सध्या बारामती स्थानकात १०० बस, १९७ चालक, १६१ वाहक असून सर्व बसच्या प्रतिदिवशी ९२० फेर्‍या होतात. यामध्ये ३५ हजार किमी अंतर प्रवास केला जातो. त्यामधून मिळणारे वार्षिक फेब्रुवारी २०२० अखेर निव्वळ उत्पन्न ४० कोटी आहे. तर सवलत मूल्यासह ५३ कोटी झाले असल्याचे आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी सांगितले. नव्या आराखड्यानुसार बारामती बस स्थानकावर २ लाख चौरस फुट बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये २४ हजार चौरस फुट प्लॅटफॉर्म असणार आहे.

असे असणार नवे बस स्थानक

  • एका वेळेस २२ बस थांबविण्याची प्लॅटफॉर्म क्षमता
  • प्लॅटफॉर्मची २४ हजार फुट लांबी
  • ५६ बसची पार्किंग व्यवस्था
  • प्रवाशासाठी स्वतंत्र पार्किंग
  • बसस्थानकालगत बस डेपो
  • हिरकणी कक्ष
  • ३० दुकाने
  • वाहक-चालक आराम कक्ष
  • कॉन्फरन्स/सेमिनार हॉल
  • अधिकारी विश्रामगृह

हेही वाचा -ऑक्सफर्डच्या 'कोविशिल्ड' लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी नोंदणी पूर्ण

हेही वाचा -बारामतीत पैसे न दिल्याने वडिलांना मारहाण

ABOUT THE AUTHOR

...view details