महाराष्ट्र

maharashtra

बारामती शहर लवकरच होणार झोपडपट्टीमुक्त, नगरपालिकेने आखला 'हा' प्लॅन

By

Published : Dec 21, 2020, 1:56 AM IST

शहरातील झोपडपट्टीधारकांना बारामती नगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत, शहरात २ हजार ५७० कुटुंबाना, चार टप्प्यात पक्के घरे मिळणार आहे. यामुळे बारामती शहर झोपडपट्टी मुक्त होणार आहे.

Baramati city council decided to build 2570 new homes for slum dwellers
बारामती शहर लवकरच होणार झोपडपट्टीमुक्त, नगरपालिकेने आखला 'हा' प्लॅन

बारामती (पुणे) - सर्वसामान्य गोर गरीब माणसाचे घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. शहरातील झोपडपट्टीधारकांना बारामती नगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत शहरात २ हजार ५७० कुटुंबाना, चार टप्प्यात पक्के घरे मिळणार आहे. यामुळे बारामती शहर झोपडपट्टी मुक्त होणार आहे.

बारामती शहरात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहिलेल्या झोपडपट्टी धारकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ही जमीन नगरपालिकेच्या नावावर झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने शासकीय निकषानुसार लाभार्थीची यादी तयार केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत २ हजार ५७० कुटुंबाना चार टप्प्यात पक्के घरे बांधण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

लाभार्थ्याला मिळणार ३६६ स्वेअर फुट घर
या प्रकल्पासाठी महा हौसिंग व नगरपालिका संयुक्तपणे काम करणार आहे. या योजनेतर्गत प्रत्येक लाभार्थीना ३६६ स्वेअर फूट घर देण्यात येणार आहे. लाभार्थीचे नाव कामगार कल्याण मंडळातर्गत नोंदणी झालेले असल्यास अतिरिक्त २ लाख व राज्य आणि केंद्राचा अडीच लाख असा साडेचार लाख आर्थिक सवलत मिळणार आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील लाभार्थीना समाजकल्याण विभागामार्फत १ लाख अधिक सवलत मिळणार आहे. प्रत्येक इमारत ५ मजली बांधून, व्यापारी दृष्टीकोन ठेऊन आवश्यकतेनुसार गाळे बांधण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.


या रहिवाशांचे होणार पुनर्वसन
बारामती शहरातील बाबासाहेब आंबेडकर वसाहत, साळवेनगर, प्रतिभानगर, सुहासनगर, वडकेनगर, स्टेडियम लगतचा भाग, सर्वेनंबर २२०, साठेनगर, पंचशीलनगर तांदुळवाडी या भागातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन होणार आहे.

९६ लाभार्थीना सूट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत राहणारे ९६ कुटुंबांना ‘बेघरांसाठी घरे’ योजनेतर्गत घरे देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याचा हिस्सा त्यांना भरावा लागणार नाही. त्यांचा हिस्सा नगरपरिषद फंडातून भरणार आहे. मात्र अन्य २ हजार ४७४ लाभार्थीना त्यांचा हिस्सा भरावा लागणार आहे.

लवकरच मिळणार घरे
बारामती शहर झोपडपट्टी मुक्त करणे, हे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. त्यादृष्टीने नगरपालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांचा सर्वे करून त्यांना लवकरच पक्की घरे देणार आहे. तसेच लवकरच या कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती बारामती नगरपालिका नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details