पुणे :जिल्हा संघाच्या ताकदवाना हर्षद कोकाटेने गतविजेत्या पृथ्वीराज पाटीलला गुणांवर मात देत ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातून आपली आगेकूच कायम राखली. आपली घोडदौड कायम ठेवण्यासाठी हर्षदला शिवराज राक्षेचे आव्हान परतवून लावावे लागेल. महाराष्ट्र केसरी वजन गटात सफाईदार आगेकूच करणाऱ्या पुण्याच्या हर्षद कोकाटेने लढतीत आपली सारी ताकद पणाला लावली. महाराष्ट्र केसरी किताबानंतर गेल्याच महिन्यात राष्ट्रीय विजेता ठरलेला पृथ्वीराज पाटिल चांगल्या लयीमध्ये होता. संभाव्य विजेता म्हणून त्याच्याकडेच बघितले जात होते. मात्र, गुरुवारी मॅटवर अनपेक्षित निर्णय लागला. गुणांवरच निर्णायक ठरलेल्या लढतीत हर्षद कोकाटेने गतविजेत्या पृथ्वीराज पाटीलचे आव्हान ९-३ असे सहज संपुष्टात आणले.
कुस्ती प्रेमीचे लक्ष लढतीकडे होते : क्रीडानगरीत उपस्थित असलेल्या प्रत्येक कुस्ती प्रेमीचे लक्ष या लढतीकडे लागले होते. हर्षदने आपली उंची आणि ताकदीचा पूर्ण उपयोग करून घेत खेळ केला. लढतीच्या सुरुवातीलाच आक्रमक खेळण्याच्या नादात पृथ्वीराजकडून लढत धोकादायक स्थितीत गेली आणि त्याचे पाठोपाठ दोनवेळा दोन गुण हर्षदला मिळाले. त्यानंतर लढत बाहेर गेल्यामुळे पृथ्वीराजला एक गुण मिळाला. पहिल्या फेरीनंतर पृथ्वीराजने सातत्याने आपली आक्रमकता कायम ठेवली. मात्र, हर्षदने आपला बचाव भक्कम ठेवत त्याला निराश केले. हर्षदने पुढे ही आघाडी आणखी भक्कम करत सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले.