पुणे- विमा कंपन्या लुबाडण्यासाठी, नफा कमविण्यासाठीच आल्या आहेत. त्यामुळे या नफ्यात कृषीमंत्र्यांना, अधिकाऱ्यांना किती पैसे मिळाले हे तपासणे गरजेचे आहे. शिवसेनेने आता मोर्चा काढला, हरकत नाही. पण कॅबिनेटमध्ये निर्णय होत असताना शिवसेनेचे मंत्री झोपा काढत होते का? असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील कंपन्यांच्या कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने मोर्चे काढण्यात आले होते. त्यावर विचारले असता आमदार बच्चू कडू म्हणाले, कॅबिनेटमध्ये आल्याशिवाय हा विषय समोर आला नसणार. शिवसेनेच्या मंत्र्यांना तेव्हाच याला विरोध करता आला असता. जर कॅबिनेटमध्ये त्यांनी विरोध केला नसेल तर मग आंदोलन करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.
आमदारांच्या वेतनात, सातव्या वेतन आयोगात गोंधळ होत नाही. जिथे जिथे शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात तिथे तिथे कायमच हा गोंधळ होतो. त्यामुळे आंदोलन करण्यापूर्वी कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव आला असताना शिवसेनेचे मंत्री झोपा काढत होते का? याचे उत्तर द्यावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.