बारामती (पुणे) -जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पुरक गाव संकल्पनेवर आधारित जनजागृतीसाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे.या चित्ररथाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली.
बारामती येथील निसर्ग जागर संस्थेच्या डॉ. महेश गायकवाड यांनी जैवविविधता पुरक गाव ही संकल्पना मांडली आहे. याबाबत माहिती देताना डॉ. गायकवाड म्हणाले, जैवविविधता पुरक गाव संकल्पना अर्थात नैसर्गिक अधिवास संरक्षण जैवविविधतापुरक गाव संकल्पना हा शासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. नैसर्गिकरित्या गावाचा विकास करीत शाश्वत विकासाची चळवळ रुजविली पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील जुनी झाडे जपली पाहिजेत. नवीन वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातीलाच प्राध्यान दिले पाहिजे. जुने पाणवठे यात ओढे, तलाव, तळी, नद्या यांचे संरक्षण झाले पाहिजे. पाणवठ्यावर कचरा टाकणे म्हणजे एक प्रकारचा गुन्हा आहे. हे थांबलेच पाहिजे. जुनी मंदिरे, देवराया, वन्यजीव व जैवविविधता याचे संरक्षण केले पाहिजे. नैसर्गिक अधिवास वाचवून शेती केली पाहिजे.
विविध पक्षी, मुंग्या व वारुळे, फुलपाखरे, मधमाशा यांना वाचविणे आवश्यक -
सेंद्रिय शेती करायची असेल तर गांडुळे, विविध पक्षी, मुंग्या व वारुळे, फुलपाखरे, मधमाशा यांना वाचविणे आवश्यक आहे. शिवाय बांधावरच्या काटेरी बोरी व साधीबाभळ, आंबा, जांभूळ, भोकर अशा झाडांचे संरक्षण केले पाहिजे. गावालगतची गायरान म्हणजे माणसाचा श्वास अर्थात फुफ्ससे आहेत म्हणून गावाभोवतीची जगल, माळरान वाचलीच पाहिजेत. जंगल, माळरानाला आगी लावल्या जाताय. असे वनवे लाखो कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, साप यांचे जीव घेतायेत. हे तात्काळ थांबले पाहिजे. सर्वांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. वनवा लावणाऱ्यांविरुद्ध वन विभागाकडे तक्रारी दिल्या पाहिजेत, तरच वणवे नियंत्रणात येतील. जंगले व माळरान वाचली तरच वन्यजीव वाचतील. जैवविविधता टिकेल, तरच मानव वाचू शकतो.
जैवविविधता गाव संकल्पनेवर होणार जनजागृती.. चित्ररथाची अजित पवारांनी केली पाहणी - जैवविविधता गाव संकल्पनेवर होणार जनजागृती
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पुरक गाव संकल्पनेवर आधारित जनजागृतीसाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे.
गवत वाढले तर भूजल वाढेल -
गावालगत असणारी वड, पिंपळ, चिंच, जांभूळ अशी स्थानिक झाडे वाचली तरच पक्ष्यांच्या वसाहतीसह घारी, बगळे, पानकावळे, पोपट, घुबड चित्रबलाक असे पक्षी वाचतील. गावात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालून त्यावर पर्यायी कापडी पिशव्या तयार करणे, गांडूळ खत निर्मिती असे अनेक उपाय केले पाहिजेत. कचरामुक्त गाव करणे, ही बाब गावासाठी अत्यंत अभिमानाची मानली पाहिजे. जलसंधारण हा विषय समजून घेऊन कार्य केले पाहिजे. गवताच्या काडीला महत्व देऊन काम केले तरच शाश्वत जलसंधारण होईल, कारण गवत वाचले तर ओलावा टिकतो आणि तरच झाडे वाढतील. तरच भूजल पातळीत वाढ होईल. हे ध्यानात घेणे आवश्यक आहे, म्हणून गवत वाढले तरच यशस्वी व शाश्वत जलसंधारण होईल.