पुणे- जंगलामध्ये राहणारा बिबट आता लोकवस्तीत येऊन ऊस शेतीत वास्तव्य करू लागला आहे. मात्र आता ऊसतोड सुरू असल्याने शेतीचे जंगलही नष्ट होणार आहे. त्यामुळे बिबट्या हिंसक बनण्याची शक्यता असते. ऊसतोड सुरू असताना कामगारांनी बिबट व त्याच्या बछड्यांना हाताळू नये, अन्यथा बिबट हल्ला करू शकतो अशी जनजागृती वनविभागाकडून सुरू आहे
ऊसतोडणीमुळे बिबट्याचे जंगल होणार जमीनदोस्त; वनविभागाकडून जनजागृती - ऊसतोड कामगार
ऊस शेतीमध्ये दबा धरून बसलेला बिबट हा अंधारात लहान मुले व पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ऊसतोडणी करत असताना पहाटे व रात्रीच्या सुमारास ऊसतोड करू नये, असे आवाहन आंबेगाव वनविभागाचे वनरक्षक शितल शिंदे यांनी ऊसतोड कामगारांना केले.
सध्या ऊसतोड कामगार पहाटेपासून ऊसतोडणीला सुरुवात करतात. यावेळी ऊसतोड कामगारांबरोबर लहान मुले, पाळीव प्राणी असतात. ऊस शेतीमध्ये दबा धरून बसलेला बिबट हा अंधारात लहान मुले व पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ऊस तोडणी करत असताना पहाटे व रात्रीच्या सुमारास ऊसतोड करू नये, असे आवाहन आंबेगाव वनविभागाचे वनरक्षक शितल शिंदे यांनी ऊसतोड कामगारांना जनजागृती करताना सांगितले.
जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यात ऊसशेती मोठ्या प्रमाणात असून या चारही तालुक्यातील परिसरामध्ये बिबट्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना भक्ष्य करत आहे. बिबट्या हल्ला करत असताना अंधारात हल्ला करतो. अशावेळी ऊसतोड करत असताना बिबट्याचे वास्तव्य या परिसरात आहे किंवा नाही याची खात्री करून ऊसतोडणीला सुरुवात करावी, लहान मुले व पाळीव प्राणी यांना ऊस शेतीपासून सुरक्षीत ठिकाणी ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.