पुणे - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्राचा दौरा अर्धवट सोडला आहे. यामुळे त्यांच्या पुणे आणि बारामतीतील सर्व सभा रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. ओवेसींनी दौरा अर्धवट सोडल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओवेसींनी महाराष्ट्र दौरा अर्धवट सोडला, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम - ओवैसी
ओवेसी यांना काही वैयक्तिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. त्याप्रमाणेच पुणे आणि बारामतीत एमआयएमला खूप प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा नव्हती. यामुळे ओवेसींच्या येथील सभा रद्द करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात अनेक ठिकाणी सभा घेणार होत्या. वंचित बहुजन आघाडीच्या या सभांची सुरुवात २० एप्रिलला खडकवासल्यातून होणार होती. मात्र, ओवेसी यांना काही वैयक्तिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. त्याप्रमाणेच पुणे आणि बारामतीत एमआयएमला खूप प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा नव्हती. यामुळे ओवेसी या दोन्ही मतदारसंघात सभेला संबोधित करणार नाहीत, असे पुण्यातील एमआयएमच्या सूत्रांनी सांगितले.
बारामतीमधील खडकवासला आणि पुण्यातील सभेसाठी वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी केली होती. खडकवासल्याच्या सभेसाठी तर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांचा दावा असतानाही मोठी मेहनत करून मैदान मिळवले होते. मात्र, सभेला ऐनवेळी मिळालेली परवानगी आणि ओवेसी सभेला न आल्यामुळे या सभेला खूप कमी प्रतिसाद मिळाला. तर पुण्यातील रविवारच्या सभेला ओवेसी संबोधित करणार नसल्याच्या वृत्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये गेल्या २ दिवसांपासून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, तरीही ओवेसी यांनी किमान रविवारच्या प्रचाराचा समारोप करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित राहावेत, यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.