पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवडमध्ये एटीएम फोडून 15 लाखांपेक्षा अधिक रक्कम चोरून पळून जाणाऱ्या चोरट्यांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना त्यांच्या चप्पलेची मदत झाली आणि आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. या एटीएम फोडीच्या घटनेत बँक कॅशिअर आणि इतर एका कर्मचाऱ्याचा समावेश होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपी हा रोहित काटे असून तो सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेत कॅशिअर आहे. तर, रोहित महादेव गुंजाळ हा देखील त्याच बँकेत काम करत होता. या दोघांसह आनंद चंद्रकांत मोरे आणि सचिन शिवाजी सुर्वे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
15 लाख घेऊन पसार -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीमध्ये असलेल्या सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेत रोहित काटे हा कॅशिअर असून त्याच्यासोबत रोहित गुंजाळ हा देखील काम करतो. दरम्यान या दोघांनी बँकेच्या शेजारी असणारे एटीएम लुटायचे असा प्लॅन केला. त्यानुसार, त्यांनी इतर दोघांची मदत घेतली. पैकी, आनंद चंद्रकांत मोरे ला एटीएमच्या लॉकर ची बनावट चावी आणि पासवर्ड सांगितला होता. ठरल्याप्रमाणे सचिन आणि आनंद यांनी मध्यरात्री एटीएममध्ये जाऊन कोणतीही तोडफोड न करता एटीएममधून तब्बल 15 लाख रक्कम घेऊन पळ काढला.