पुणे :वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर खटला दाखल झाल्यानंतर समन्स बजावूनही हजर न राहणाऱ्या वाहनचालकांना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. पहिल्या टप्प्यात ७३२ वाहन चालकांना हे वॉरंट जारी केले आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरीत वाहनचालकांना वॉरंट बजावले जाणार आहेत. हे वॉरंट मोटर वाहन न्यायालयाकडून बजावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त (वाहतूक) विजय मगर यांनी दिली.
अशा वाहनचालकांवर खटले दाखल :वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन कायद्याअंतर्गत वाहतूक विभागाने सन २०२० पासून वाहतूक नियमांचे भंग केल्यानंतर तडजोड खटल्याकरिता न्यायालयासमोर वेळोवेळी उपस्थित राहिले नाहीत अशा वाहनधारकांवर मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेले होते. दाखल खटल्यांच्या अनुषंगाने न्यायालयाने संबंधितांना वेळोवेळी कायदेशीर प्रक्रियेव्दारे समन्स पाठवले होते.
७३२ वॉरंट वाहतूक विभागास प्राप्त :अद्यापपर्यंत संबंधित वाहनधारकांनी वाहतूक विभागामध्ये अथवा न्यायालयामध्ये तडजोड केलेली नाही. या प्रकारच्या केसेस मोठ्या प्रमाणात न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. याकरिता न्यायालयाने अशा वाहनधारकांवर पकड/अटक वॉरंट जारी केलेले आहेत. मोटार वाहन न्यायालयाकडून पहिल्या टप्प्यामध्ये असे ७३२ वॉरंट वाहतूक विभागास सध्या प्राप्त झालेले आहेत. न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या पकड वॉरंटमधील संबंधित वाहनधारकांनी ८ दिवसांच्या कालावधी मोटार वाहन न्यायालयात उपस्थित होत खटल्यासंबंधी निकाल लावून घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास पोलीस विभागास संबंधितास पकड वॉरंटव्दारे अटक करून न्यायालयासमोर हजर करावे लागणार आहे. तरी वाहनचालकांनी आपल्या वाहनावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबाबत प्रलंबित असलेली तडजोड न्यायालयात त्वरित प्रभावाने करून घ्यावी. जेणेकरुन त्यांना अटक टाळता येईल.
वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर होणार कारवाई :पुण्यात वाढत्या वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे. अशातच मनमर्जीप्रमाणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. याला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागानेही कंबर कसली आहे. यापुढे वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर दंड तर आकारला जाईल. शिवाय कायदेशीर कारवाईसुद्धा केली जाईल, असा इशारा वाहतूक विभाग प्रमुखांकडून देण्यात आला आहे.