पुणे / मुंबई :ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट (New variant of Omicron) बीए ४ आणि बीए ५ चे एकूण सात रुग्ण पुण्यात सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्टवर (Alert on health system) आहे. पुण्यात ओमायक्रॉनच्या २ नव्या सब व्हेरिएंट म्हणजेच बीए ४ चे ४ तर बीए ५ चे ३ रुग्ण सापडले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे हे व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहेत आणि ४ ते १८ मे २०२२ या कालावधीतील आहेत.
या रुग्णांत ४ पुरुष तर ३ महिला आहेत. यातील ४ जण ५० वर्षांवरील आहेत तर २ जण २० ते ४० वर्षे या वयोगटातील आहेत. तर एकजण १० वर्षांखालील आहे. यातील दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका, बेल्जियम प्रवासाचा इतिहास आहे तर तर ३ जणांनी भारतात केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रवास केला आहे. दोन रुग्णांचा कोणताही प्रवासाचा इतिहास नाही. यातील ९ वर्षाचा एक मुलगा वगळता सर्वानी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.तर एकाने बूस्टर देखील घेतलेला आहे.
यातील सर्वांना कोविडची सौम्य लक्षणे होती. कोणालाही रुग्णालयात भरती करण्याची गरज भासलेली नाही. प्रत्येकाला घरगुती विलगीकरणात उपचार देण्यात आले. आता हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. बी. ए. ४ आणि ५ हे ओमायक्रॉन वंशावळीतील असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग काहीसा वाढतो असे आंतरराष्ट्रीय अनुभवावरुन लक्षात आले आहे असे तज्ञांचे मत आहे.