पुणे- स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेले शिवसेना नेते आणि अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे हे शिवबंधनातून मुक्त होणार असून त्यांच्या हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोल्हे राष्ट्रवादीत प्रवेश करुन शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याचे समजते. त्यामुळे शिरूर मतदारसंघात शिवाजी विरुद्ध संभाजी,अशी लढत होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षांतरच्या चर्चांना वेग आला होता. ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करुन शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. सध्या शिरुरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार आहेत. जर कोल्हेंनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली तर शिवाजीराव पाटील आणि कोल्हे यांच्यात रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.
अमोल कोल्हेंचा शिवसेनेतील कामगिरी
अमोल कोल्हेंनी १९ मार्च २०१४ ला शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हे सेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांच्या भाषणशैलीमुळे लोक त्यांची सभा ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत होते. २०१५ पासून कोल्हे हे शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाचे संपर्कप्रमुखपद सांभाळत होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेत सेनेची पिछेहट झाल्यानंतर कोल्हेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती.
राष्ट्रवादीकडून 'या' नावांची चर्चा