अमोल कोल्हेंची मुलाखत घेताना ईटीव्ही प्रतिनिधी पुणे:गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. ते निवडणूक लढविणार नसल्याचे देखील सांगितले जात होते; पण आजच्या बैठकीत पवार यांनी कोल्हे यांना पुन्हा एकदा तयारीला लागा, असे सांगितल्याने इतर चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा:याबाबत अमोल कोल्हे म्हणाले की, आज शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. 'साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण' असणार आहे. कला क्षेत्रात काम करत असताना राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वच विषयांवर इतर सर्व पक्षातील नेते मंडळींची भेट होत असते. यातून वेगळा कोणताही अर्थ काढू नये. माणूस महत्त्वाचा नसून पक्ष महत्त्वाचा आहे आणि पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल.
निवडणुकीला सामोरे जाणार:2019 साली जेव्हा लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा प्रश्न वेगळे होते. आज त्यातील 2 प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. आज महाविकास आघाडी म्हणून मोठी ताकद सोबत असल्याने येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे, असे देखील यावेळी कोल्हे म्हणाले. यावेळी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याशी खास बातचीत केली आहे...पाहूया
कॉंग्रेसचाही बैठकींचा सपाटा: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सत्ताधारी आणि विरोधक लागले आहेत. राज्यात लोकसभा पूर्व तयारीत सेना भाजपा युतीपेक्षा महाविकास आघाडीतील घटकपक्ष आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांनंतर काँग्रेस पक्षाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस टिळक भवन या पक्ष कार्यालयात दोन दिवस बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवस बैठका असणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी बैठकीला सुरुवात झाली. राज्यातील लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेतला जात आहे. शुक्रवारी 23 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
मतदारसंघाचा आढावा:जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, 2019 लोकसभा, विधानसभा काँग्रेस उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष यांच्याकडून काँग्रेस हे लोकसभा मतदारसंघातील आढावा घेणार आहेत. त्यानंतर पुढची रणनिती ठरवली जाणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा:
- फडणवीसांचा मक्का मदीना दिल्लीत पण, शिंदे गटाची दिल्तीत मुजरा घालून गुलामी - संजय राऊत
- Maharashtra Politics: आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार, बहुमताने जिंकणार- दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दावा
- Rahul Gandhi on PM Modi : आता पंतप्रधान मोदी म्हणतील इंग्रजांच्या चुकीमुळे रेल्वेचा अपघात - राहुल गांधी