पुणे : शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा फ्री पास मिळावा म्हणून पोलिसांनेच धमकी दिल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. विशेष म्हणजे शिवपुत्र संभाजी या महानाट्यातील प्रमुख कलाकार खासदार अमोल कोल्हे हे आहेत. दरम्यान मोफत पास पाहिजे म्हणून नाटक बंद पाडण्याची धमकी पोलिसाने दिली असल्याची माहिती स्वत:खासदार कोल्हे यांनी व्हिडिओ शेअर करत दिली आहे. डॉ.अमोल कोल्हे हे शिरुर लोकसभेचे खासदार आहेत, त्यांच्या नाटकावेळी पोलिसाने धमकी दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कुठे होते नाटकाचे आयोजन : शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पिंपरी चिंचवड शहरातील एच ए ग्राउंडवर आयोजित करण्यात आले आहे. या महानाट्याला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या महानाट्याचे फ्री पास मिळावे म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलिसाने चक्क नाटकाच्या आयोजकाला धमकी दिल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला. कोल्हे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून यातून त्यांनी एक कळकळीची विनंती केली आहे.
मोफत पाससाठी पोलिसाची धमकी : "फ्री पास दिला नाही, तर नाटक कसं होते ते मी पाहतो" असे म्हणत पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने चक्क नाटकाच्या आयोजकाला धमकी दिल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचा आरोप स्वतः अमोल कोल्हे यांनी महानाट्याच्या व्यासपीठावरून केला आहे. त्यासोबतच त्यांनी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करावी, अशी मागणी देखील केली.