पुणे - बारामती हे विकासाचे रोडमॉडेल म्हणून ओळखले जाते. बारामतीच्या विकासाबाबत आजवर अनेक दिग्गजांनी तसे बोलूनही दाखवले आहे. अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून पवार कुंटुंबीयांनी बारामती आणि परिसराचा खूप मोठा विकास केला आहे. या ट्रस्टव्दारे आयोजित करण्यात येत असलेल्या कृषीप्रदर्शनाला गेल्या दोन-तीन वर्षापासून येण्याचा मानस होता. याठिकाणी येऊन खूप काही शिकण्याची इच्छा होती. मात्र, या प्रदर्शनाचे भव्य रूप पाहता एका दिवसात काही शिकता येणार नाही, त्यासाठी तीन चार दिवस मुक्काम करावा लागेल, असे भाव सिनेअभिनेता आमिर खान याने व्यक्त केले.
बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या कृषिक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आमिर बोलत होता. पानी फाऊंडेशनच्यावतीने आम्ही ठिकठिकाणीच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत निसर्ग, पर्यावरण या विषयावर संवाद साधत आहोत. पाणी हा मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून त्याबाबचे शिक्षण खूप गरजेचे आहे. मागील ४ वर्षापासून पाणी व्यवस्थापना संदर्भात गावातील लोकांना आम्ही माहिती देत आहोत. यापुढे पाण्याच्या नियोजनाबरोबरच पीक नियोजन, जमीनीचे आरोग्य, गवत लागवड क्षेत्र निर्माण करणे, रीफॉरेस्ट्रेशन या ५ बाबींवर काम करणार असल्याचे आमिरने सांगितले.