पुणे:महाविकास आघाडीतील जागावाटपावरून तिन्ही पक्ष वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. विशेषत: पुण्यातील लोकसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी आग्रही आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबतची भूमिका माध्यमांबरोबर बोलताना स्पष्ट केली आहे.
निवडणुकीतील उमेदवार कोणत्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतो आहे का, हे पाहण्यापेक्षा महाविकास आघाडीचा खासदार किंवा आमदार वाढवायचा, असा विचार महत्त्वाचा आहे. असा सगळेच पक्ष विचार करत आहेत. या विषयाची माध्यमासमोर चर्चा करण्याऐवजी एकत्रित चर्चा करावी, हे छगन भुजबळांनी मत व्यक्त केले. त्याविचाराशी सहमत असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितले.
निवडून येणारा उमेदवार देण्याची गरज :निवडणूका लढण्यासाठी सगळेजण चाचपणी करत आहेत, आम्हीही 30 व 31 मे रोजी बैठका घेत आहोत. राजकीय पक्षांनी तयारी करणे हे काम आहे. खासदारकी आमदारकी एकत्र लढवण्याविषयी आमच्या वरिष्ठांनी मत बनविले आहे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढल्याशिवाय शिंदे फडणवीस सरकारला रोखता येणार नाही. जिथे आमची ताकद आहे, तिथं आणखी ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध लढण्यासाठी कुठल्याही एका राजकीय पक्षाकडे ताकद नाही. त्यामुळे निवडून येणारा उमेदवार देण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सर्वच पक्ष असाच प्रयत्न करत असल्याचेसुद्धा ते म्हणाले आहेत.
सावित्रीबाईंचा पुतळा हटविल्याचा निषेध-स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनामधे सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर पुतळा हटविण्यात आला आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले यापूर्वीही महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य करण्यात आली आहेत. त्यावर आम्ही जाबही विचारला. यावेळी तर त्यांनी कहरच केला आहे. सावरकरांच्या अर्ध पुतळ्याचे उदघाटन करताना सावित्रीबाई फुले, आणि अहिल्याबाई होळकर यांचे अर्ध पुतळे हटविले. हे करायला नको होते. हे जाणीवपूर्वक होत का हे माहीत नाही. मी याचा तीव्र निषेध करतो. दिल्लीत कुस्तीपटू महिला खेळाडू आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, की ते खेळाडू आहेत, त्यांना राजकारण करायचे नाही. मला वाटलं होते, क्रीडामंत्री हा विषय मार्गी लावतील. पण तसे झाले नाही.