बारामती :यंदा पावसाने साथ दिलेली नाही. ती दिली असती तर पालखी सोहळ्यातील संख्या वाढली असती. तरी मोठा उत्साह दिसतो आहे. रस्ते मोठे रुंद झाले आहेत. त्यामुळे चालताना सोपे जाते. पूर्वी रस्ते अरुंद असल्यामुळे वारीला अडथळा निर्माण व्हायचा. बारामतीकरांचा उत्साह खूप होता. अबालवृद्ध सहभागी झाले. मलाही सोहळ्यात सहभागी झाल्याने समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
संतांच्या विचाराने वाटचाल : संतांच्या विचाराने आपण सर्वांनी वाटचाल करणे गरजेचे आहे. प्रचंड जनसमुदाय, माणूसकी जपायची असते. माझ्या सहकाऱ्यांकडून अनेकदा मला पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची मागणी केली जात होती. दरवर्षी पालखी मुक्कामाला बारामतीत असते. त्यामुळे यंदा सहभागी होत सारथ्य करण्याचा योग आला. मनाला वेगळे समाधान मिळाले. मी उपमुख्यमंत्री असताना अनेकदा कार्तिक एकादशीला सपत्निक आरती, महापूजेसाठी पंढरपूरला उपस्थित राहिलो आहे. परंतु यंदा आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोहळ्यात सहभागी होता आले. ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना मी सलग तीन वर्षे कुटुंबासह पंढरपूरला आषाढीला आरती व महापूजेसाठी गेलो होतो. मला अनेकदा बारामतीकरांच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमुळे महापूजेचा मान मिळाला, ही समाधानाची बाब आहे.
आनंद घेतला : पूर्वी आम्ही काटेवाडीला राहायला होतो. तेथे मोठा गोठा होता. बारा बैलांचा गोठ्यात समावेश होता. आजही दोन चांगली बैल दोन गोठ्यात आहेत. आज पालखी सोहळ्यातील बैलजोडी पाहिली. त्यात मनाला समाधान मिळाले. फुगडी खेळत आनंद घेतला. पूर्वीच्या काळात मी खेळताना चक्कर यायची नाही, पण आज जरा फुगडी खेळताना चक्कर आली. सोहळ्यात सहभागी होताना काही मागितले नाही. फक्त आनंद घेतला.