पुणे - शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असलेली कामे शहराच्या सुविधा, सौंदर्य, वैभवात भर घालणारी असली पाहिजेत. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा. लोकप्रतिनिधींच्या व ‘स्मार्ट सिटी’ मिशनच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ‘स्मार्ट सिटी’ संदर्भातील पुणे शहराचे राष्ट्रीय रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न व्हावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या 'स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम'ची पाचवी बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील विधानभवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत. सर्व प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी नियोजन करा. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करुन कामे वेळेत व्हायला हवीत. तसेच देशात पुणे स्मार्ट सिटीचे रँकींग सुधारण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.
हा प्रकल्प राबविताना लोकप्रतिनिधी व अनुभवी तज्ञांच्या सूचना विचारात घेऊन 'स्मार्ट सिटी मिशन' च्या मार्गदर्शक तत्वानुसार कामे करुन घ्यावीत. कामात पारदर्शकता ठेवून कोणतीही कसर राहणार नाही, याची दक्षता घ्या, विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय ठेवून सुरु असणारी कामे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावीत, असेही त्यांनी सांगितले.