पुणे -माळेगाव कारखाना चालवणार्या भाजपने बारामती, इंदापूरला नीरा देवधर धरणातून मिळणारे पाणी बंद केले होते. नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याचा निर्णय जर मी घेतला नसता, तर उन्हाळ्यात पिकांची धूळधाण झाली असती, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त निलकंठेश्वर पॅनलच्या प्रचारासाठी सांगवी पणदरे येथे आयोजित केलेल्या सभेत अजित पवार बोलत होते. तुम्ही शेतकरी असाल तर कारखाना ताब्यात द्या, ५ वर्षे चांगला दर देण्याची जबाबदारी माझी राहील असे आश्वासनही यावेळी अजित पवार यांनी दिले.
नीरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे 55 टक्के पाणी पुन्हा डाव्या कालव्यात सोडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आम्ही फलटण, पंढरपूर, माळशिरस, सांगोला या कोणत्याही तालुक्यावर अन्याय केलेला नाही. आम्ही समन्यायी निर्णय घेतला आहे. सत्ता असतानाही शेजार धर्म पाळला आहे. जे कारखाना चालवतात त्यांनी तुमचे पाणी बंद केले होते. बंद पाईपमधून पाणी आणणार असल्याची भाजपची कल्पना होती. मात्र, त्यामुळे पाण्याअभावी पिके जळाली असती, असेही अजित पवार म्हणाले.