पिंपरी चिंचवड (पुणे) -मराठा आरक्षणाला न्यायलयाने स्थगिती दिल्यानंतर पुन्हा मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना या संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवडचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या घरासमोर संबंधित मराठा सेवा संघ आणि इतर संघटनांनी संभळ वाजवून मराठा आरक्षणाविषयी लक्ष वेधून घेण्याकरिता आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार, खासदारांना यासंबंधीचे निवेदनही देण्यात आले आहे.
मराठा आरक्षण प्रकरण : पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय आमदार, खासदारांच्या घरासमोर आंदोलन
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. मराठा समाजाने यावर नाराजी व्यक्त केली आहे. आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व पक्षीय आमदार, खासदारांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकार आणि राज्यसरकारने विनाविलंब जलद गतीने लक्ष घालून घटना दुरुस्ती करून आरक्षण द्यावे, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव यांनी यावेळी दिला आहे.
मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव म्हणाले, मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्टया मागास आहे, असा अहवाल दिला. या अहवालानुसार मराठा समाज हा आरक्षण घेण्यासाठी पात्र ठरतो. त्यामुळे मराठा समाजाला राज्य आणि केंद्राच्या शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले जात आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन न्यायालयाने अनाकलनीय निर्णय दिला आहे. यामुळे मराठा समाजावरती अन्याय झाला आहे. आरक्षणास पात्र ठरत असताना 50 टक्क्यांची मर्यादा सांगून आमचे आरक्षण डावलले गेले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.