पुणे : आघारकर संशोधन (Agharkar Research Institute) संस्थेने नुकतीच १ ऑक्टोबर २०२२ रोजी पंचाहत्तर वर्ष पूर्ण (Agharkar Research Institute Pune is going to complete 76 years) केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. संस्थेचे संस्थापक, संचालक, प्राध्यापक डॉक्टर शंकर पुरुषोत्तम आघारकर यांची या दिवशी जयंती आहे. पुण्यातील आघारकर संशोधन संस्था ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानित स्वायत्त संस्था असून; ती पुणे विद्यापीठ व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे, त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्युत्तर व पीएच.डी.चे अभ्यासक्रम राबवते. त्या शिवाय ही संस्था भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने जैवविज्ञानाशी संबधित संशोधन प्रकल्प हाती घेते. या संस्थेला येत्या 18 नोव्हेंबर ला 76 वर्ष पूर्ण होणार आहे. एकूणच या संस्थेचा इतिहास (organizations history) काय आहे? आज आपण पाहणार आहोत.
वैज्ञानिक संशोधन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी या संस्थेची स्थापना 1 ऑक्टोबर 1946 रोजी करण्यात आली. महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (एम ए सी एस) या नावाने ही संस्था आहे. डॉ.धनंजयराव गाडगीळ बॅरिस्टर एम आर जयकर, प्राध्यापक शंकर पुरुषोत्तम आघारकर आणि काही नामवंत शिक्षणतज्ञ यांनी या संस्थेच्या स्थापनेचा पाया रचला. त्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एम ए सी एस ची स्थापना झाली. संस्थापक सदस्यांपैकी निवृत्त प्राध्यापक शंकर पुरषोत्तम आघारकर हे वनस्पती तज्ञ होते. कलकता विद्यापीठातून निवृत झाल्यानंतर प्रा. आघारकर पुण्यात स्थायिक झाले. प्रा. आघारकर यांच्या नेतृत्वाखाली एम ए सी एस च्या संशोधन कार्याची सुरवात झाली. जर्मनीतील बर्लिन विद्यापीठातून प्रा. आघारकर यांनी पीएचडी पदवी संपादन केली होती. ते कलकता विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे घोष प्राध्यापक, बंगालच्या बोटेनिकल सोसायटीचे अध्यक्ष (1940-1945) आणि एशियाटिक सोसायटीचे सचिव (1943-1945) होते. इतर अनेक वैज्ञानिक संस्थांमध्ये त्यांनी मानद पदे भूषविली होती. संस्थेच्या स्थापनेमध्ये विधी क्षेत्रातील प्राचार्य जे आर घारपुरे हे देखील सक्रीय होते. संस्था प्राथमिक स्वरूपात असताना इंडियन लॉ सोसाइटी च्या लॉ कॉलेज ने जागा दिली. आणि एम ए सी एस च्या कार्याची सुरवात झाली.
पुढील काळात गोखले इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स एंड इकोनॉमिक्स च्या इमारतीमध्ये देखील एम ए सी एस च्या कार्यासाठी जागा उपलब्ध झाली. आज या तिन्ही संस्था एकमेकांच्या शेजारी आहेत आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करीत आहेत. प्रा. आघारकर यांनी 1946-60 या कालावधीत एम. ए. सी एस संशोधन संस्थेचे संचालक पद सांभाळून संस्थेचा पाया रचला. सुरुवातीच्या काळात निवृत्त परंतु उत्साही संशोधकांनी आपल्या ज्ञानाचे योगदान दिले. त्यातून संस्थेमध्ये विविध विषयातील संशोधनाची सुरुवात झाली. कालांतराने भारत सरकारने विद्यमान संशोधन संस्थांना स्वायत्त संस्थांचा दर्जा दिला. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डी एस टी) एम ए सी एस संशोधन संस्थेला स्वायत संशोधन संस्थांच्या कायमस्वरूपी यादीत समाविष्ट केले. १० सप्टेंबर १९९२ रोजी एम ए सी एस च्या संशोधन संस्थेचे आघारकर संशोधन संस्था (ए आर आय) असे नामकरण करण्यात आले.
आघारकर संशोधन संस्थेत मुख्यत्वे जीवशास्त्रातील संशोधन केले जाते. संस्थेने विकसित केलेल्या गहू, सोयाबीन आणि द्राक्षाच्या जातींना भारत सरकारच्या संबंधीत विभागांकडून लागवडीसाठी मान्यता मिळाल्या आहेत. आतापर्यंत संस्थेने गव्हाचे चौदा आणि सोयाबीनचे बारा वाण विकसित केले आहेत. द्राक्षाची वाण ए आर आय 516 ला लागवडीसाठी मागणी वाढत चालली आहे. बारामती तालुक्यामध्ये संस्थेच्या शेतजमिनीवर नवीन वाणांच्या विकासासाठी प्रयोग चालू असतात. उत्तम गुणांमुळे सर्व वाणांना शेतकऱ्यांकडून वाढती मागणी आहे, अशी माहिती यावेळी संस्थेचे संचालक डॉक्टर प्रशांत ढाकेफळकर यांनी यावेळी दिली.
सूक्ष्मजीवाचा वापर करून औद्योगिक सांडपाण्यावर उपचार, बायोगॅस निर्मिती, धातू आणि खनिजे यावर संस्थेने केलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. अलिकडे संस्थेने विकसित केलेल्या प्रक्रियेमुळे पंजाब आणि हरयाणातील तांदुळाच्या शेतातील पार्ली पासून ऊर्जा निर्मिती करणे शक्य होणार आहे. सध्या पार्ली जाळून टाकली जाते. त्यामुळे दर वर्षी दिल्लीला हवा प्रदूषणाचा सामना करावा लागतो. याच वर्षी संस्थेने सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने हायड्रोजन निर्मितीची प्रक्रिया विकसित केली आहे. पर्यावरण पूरक प्रक्रिया आणि ऊर्जेची वाढती गरज यामुळे संस्थेने विकसित या पद्धती औदयोगिक क्षेत्राचे लक्ष वेधून घेतात. आता पर्यन्त अनेक उद्योगांनी संस्थेबरोबर संयुक्तपणे या प्रक्रिया विकसित केल्या आहेत.
वनस्पतीमधील विविधता अभ्यासण्यात संस्थेकडून अव्याहतपणे संशोधन केले जात आहे. पश्चिम घाटातील देवराया, लोकवनस्पती विज्ञान, औषधी वनस्पती, डायटम, बुरशी आणि त्यांचे प्रकार यांच्या नोंदी करून, आपल्या देशातील जैविक विविधतेची जोपासना करण्यात मोठा हातभार लावला आहे. जीवाश्माचे संशोधन हे या संस्थेचे आणखी एक वैशिष्ठ्य आहे. करोडो वर्षापूर्वीच्या जिवाश्मांचा अभ्यास करून पृथ्वीवरील प्राणी आणि पाम कुळातील वनस्पती कशा आणि कुठे असाव्यात. त्यावेळचे वातावरण कसे असेल, भूशास्त्रीय रचना इत्यादी नोंदी केल्या जातात.
नॅनोतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संस्थेने अल्पावधीत मोठी झेप घेतली आहे. आरोग्य आणि कृषीच्या विविध गरजा भागविण्यासाठी नॅनोतंत्रज्ञान वापरून उद्योगांना आकर्षित करणाऱ्या प्रणाली विकसित केल्या आहेत. विषाणूंच्या संशोधनावर संस्थेने गेल्या काही वर्षात लक्षणीय प्रगती केली आहे. वनस्पतीमधील रसायनांची विविध आजारांवर उपचार करण्याची क्षमता आणि त्या रसायनांचे संश्लेषण हे एक आकर्षक क्षेत्र संस्थेने जोपासले आहे. शालेय विद्यार्थी, ग्रामीण भागातील महिला, त्याचे आहार यावर संस्थेने मोठे योगदान दिले आहे. शरीरातील जडणघडण समजण्यासाठी अतिशय सूक्ष्म स्तरावरील बदलांचा अभ्यास करता यावा म्हणून हा डोसीफिला(फळमाशी), झेब्राफिश इत्यादीचा वापर केला जात आहे. कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी संस्थेला भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने मान्यता दिली. त्या अंतर्गत संस्थेने राष्ट्रीय कार्यक्रमात एक मोठी भूमिका वठविली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्षेत्रातील एक मान्यताप्राप्त केंद्र म्हणून आघारकर संशोधन संस्थेची वाटचाल चालू आहे. संस्था मूलभूत आणि उपयोजित संशोधन करत आहे. संस्थेमध्ये जीवाणू, बुरशी, कवक, वनस्पती, आणि जीवाश्म यांचे संग्रह आहेत. जिवाणूंच्या संग्रहामध्ये धातूच्या खाणींमधून अधिक प्रमाणात धातू काढणारे जिवाणू आहेत. त्यांचा वापर करून केल्या जाणाऱ्या पद्धतीला बायोमाइनिंग असे म्हणतात. जिवाणूंचा उपयोग करून औद्योगिक सांडपाण्यावर उपचार करणारे जिवाणू सुद्धा या संग्रहामध्ये उपलब्ध आहेत. औद्योगिक प्रक्रियांमध्ये पर्यावरण पूरक जैविक पद्धती विकसित करण्यात संस्थेला यश आले आहे.