महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 29, 2020, 7:05 PM IST

Updated : Oct 29, 2020, 7:52 PM IST

ETV Bharat / state

कुलगुरूंच्या आश्वासनानंतर पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना आलेल्या अनेक अडचणी तसेच विधी शाखेच्या पदवी संदर्भातला विषय, विद्यापीठाकडून आकारल्या जाणाऱ्या विविध शुल्कांबाबतचा विषय, तसेच एका विषयाचा पेपर गायब होण्यासारखी घटना या संदर्भामध्ये विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यापीठांमध्ये 'पुंगी बजाव आंदोलन' करण्यात आले होते.

पुणे
पुणे

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या आहेत. त्यांच्या अडचणी विद्यापीठाकडून सोडवल्या जातील कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. तसेच विद्यापीठाच्या परीक्षांचे 95 टक्के निकाल 10 नोव्हेंबरच्या आधी लावले जातील, असे आश्‍वासन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर यांनी दिले. पुणे विद्यापीठामध्ये गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या 'पुंगी बजाव आंदोलना'नंतर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना हे आश्वासन दिले आहे.

कुलगुरूंच्या आश्वासनानंतर पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना आलेल्या अनेक अडचणी तसेच विधी शाखेच्या पदवी संदर्भातला विषय, विद्यापीठाकडून आकारल्या जाणाऱ्या विविध शुल्कांबाबतचा विषय, तसेच एका विषयाचा पेपर गायब होण्यासारखी घटना या संदर्भामध्ये विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यापीठांमध्ये 'पुंगी बजाव आंदोलन' करण्यात आले होते.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये जोरदार घोषणाबाजी

प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. ऑनलाइन परीक्षेच्या दरम्यान झालेल्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असे विविध आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या आवारात जोरदार आंदोलन केले. तसेच विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी करत सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाचा आणि सरकारचा धिक्कार केला, यावेळी मुख्य इमारतीमध्ये कुलगुरू उपस्थित नसल्याने कुलगुरू प्रत्यक्ष भेटून निवेदन स्वीकारत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला. त्यानंतर तब्बल चार ते पाच तास विद्यापीठाच्या आवारामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन सुरूच ठेवले.

कुलगुरूंचे विद्यार्थ्यांना आश्वासन

कुलगुरू नियोजित कार्यक्रमांमध्ये व्यग्र असल्याने त्यांना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना भेटण्यास उशीर झाला होता. त्यामुळे विद्यार्थी अधिकच संतप्त झाले होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विद्यापीठाच्या आवारात कुलगुरू दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन देत सर्व प्रकारच्या समस्या सोडवल्या जातील, असे सांगितल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपले आंदोलन मागे घेतले.

Last Updated : Oct 29, 2020, 7:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details