पुणे- सोने व्यापाऱ्यांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून त्याला लुबाडणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 9 किलो 600 ग्रॅम वजनाचे 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गणेश दगडू पवार (वय 27), अभिजित उर्फ बाळू दिलीप चव्हाण (वय 23), मोहसीन हमजेखान मुलानी (वय 25), प्रथमेश विजय भांबुरे (वय 26) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आप्पा श्रीराम कदम यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा -सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून भावंडांना मारहाण; तिघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आप्पा व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवण्याची सवय आहे. आरोपींना अप्पा हा दौंड येथे उतरून सोने घेऊन जात असल्याची माहीती होते. काही दिवसांपूर्वी आप्पा यांनी 'गुड बाय कौठळी' असे स्टेटस ठेवले. आरोपी आप्पा यांच्या स्टेटसवर लक्ष ठेऊन होते. आप्पांचे स्टेटस अपडेट होताच आरोपींनी त्यांना लुटण्याचा कट रचला. 6 नोव्हेंबरला पहाटे पावणेसहाच्या सुमारास आप्पा आणि त्यांचे जोडीदार हे दोघेजण कोलकाता ते मुंबई या रेल्वेतून दौंड रेल्वे स्टेशनवर उतरले. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले असता आरोपींनी त्यांना गाठले. आप्पा आणि त्यांच्या साथीदाराला प्रवासी म्हणून कारमध्ये बसवून त्यांना कुरकुंभ, भिगवण मार्गे बांगरवाडी गावाच्या हद्दीत नेले.