पुणे - स्वराज्यरक्षक संभाजी मालिका हे एक व्रत आणि स्वप्न होते. ती मालिका आता पुर्णत्वास जात असताना अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेऊन शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण वेळ देण्याचे आश्वासन खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी दिले. शुक्रवारी मालिकेचा शेवट लवकरच होत असताना पुढील काळात संपूर्ण वेळ मतदार संघात देणार असल्याचे कोल्हेंनी स्पष्ट केले. ते छत्रपती संभाजी महाराज बलिदानस्थळी पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकसभा निवडणुकीनंतर खासदार कोल्हे मतदार संघात येत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस येत होत्या. चार महिन्यांपूर्वी खासदारांचा जनता दरबार भरणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, खासदार कोल्हे वेळ देऊ शकले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटताना दिसत होता. यावर बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, की मागील एक वर्षात नेता की अभिनेता असाच प्रवास झाला. यापुढे जनतेच्या कामांना वेळ देणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.