पिंपरी (पुणे) -पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरु आहे. त्यात गुन्हे शाखा युनिट पाचने मोठी भर घातली आहे. देहूरोड परिसरात सुरु असलेल्या तीन अवैध धंद्यांवर कारवाई करत गुन्हे शाखा युनिट पाचने नऊ लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सहा आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी शशांक अनिल कसेरवाणी (29 वर्ष) रा यमुनानगर, निगडी, अनिल मथुकर शिरसाट (25 वर्ष) रा. टॉवर लाईन चिखली, चंद्रकांत हरीदास समक्ष (22 वर्ष) रा. मोई, चिखली, विंदु चंदी यादव (33 वर्ष) रा. तळवडे, दिपक चंदी यादव (22 वर्ष) रा. तळवडे आणि रियाज अजिज शेख (42 वर्ष) रा. मेन बाजार, देहूरोड यांना तीन कारवायांमध्ये अटक करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईमध्ये 84 हजारांचा मुद्देमाल जप्त-
तळवडे गावच्या बाहेर चिंचवड-आकुर्डी लिंकरोडने तळवडे चौकाकडे येणाऱ्या मार्गावर एका दुकानात ऑनलाईन लॉटरी सुरु आहे. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अंमलदार मयूर वाडकर आणि गणेश मालुसरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ऑनलाईन लॉटरी सेंटरवर छापा मारला. त्यात 84 हजार 130 रुपये किमतीचे जुगार साहित्य जप्त केले. तसेच याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
दुसऱ्या कारवाईमध्ये 6 लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त-
दुसऱ्या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे गावाच्या बाहेर देहु-आळंदी रोडवर, केनबे चौक व तळवडे चौकात असलेल्या कृष्णा सुपर मार्केट या दुकानावर छापा टाकला. छाप्यामध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची साठवणूक करुन विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 6 लाख 29 हजार 571 रुपये किंमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे.
तिसऱ्या करवाईमध्ये 1 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त-
गुन्हे शाखा युनिट पाचने तिसरी कारवाई देहूरोड मेन बाजार येथे केली. सहाय्यक निरीक्षक राम गोमारे यांना माहिती मिळाली की, देहूरोड मेन बाजार येथे क्रिस्टल ब्युटी सलुन अॅन्ड स्पा हे दुकान आहे. त्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवले आहेत. त्यानुसार पोलिसांनी दुकानावर छापा मारून रियाज अजिज शेख याला अटक केली. त्याच्याकडून एक लाख 92 हजार 602 रुपये किंमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणांमध्ये देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या पोलीस पथकाने केली कारवाई-
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, राजेंद्र साळुंके, गणेश मालुसरे, संदिप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, भरत माने, सावन राठोड, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र कदम यांनी केली आहे.
देहूरोड येथे अवैध धंद्यांवर गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई
पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरु आहे.
नऊ लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त