बारामती- सील तुटलेल्या कोरोना लसीच्या बाटल्यातून भेसळयुक्त लस देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बारामती शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. भेसळयुक्त द्रव्याचा वापर करून कोरोना प्रतिबंधात्मक लस असल्याचे भासवून शिबिराद्वारे नागरिकांना लस देण्यात आली होती. मात्र, या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईतील हिरानंदानी सोसायटीमध्ये उघडकीस आला होता. त्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पांडे याच्यावर कांदवली पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपी बारामतीत जेरबंद बारामती पोलिसांनी कांदिवली पोलिसांचा फोन-
पांडे हा गुन्हा घडल्यापासून अटक चुकविण्यासाठी मुंबई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता. तसेच पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी पुणे शहर व परिसरात फिरत होता. याबाबतची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना फोनद्वारे माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः नामदेव शिंदे यांनी पथक तयार करून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीचा शोध घेत असता, आरोपी भिगवन रोड येथील अमृता लॉज याठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस पथकाला मिळाली. मात्र, आरोपी चकवा देण्यास तरबेज आणि उच्चशिक्षित असल्याने पोलिसांनी त्यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले.
रिकाम्या बाटल्यात भरली भेसळयुक्त लस-
हिरानंदानी सोसायटी बनावट लसीकरण प्रकरणातील आरोपी हा एका नामांकित हॉस्पिटल मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून नोकरीस होता. आरोपी पांडे व त्याच्या साथीदारांनी बोगस लसीकरण शिबिराद्वारे सील तुटलेल्या व्हॅक्सीन बाटल्यांमधुन भेसळयुक्त लस भरली. त्यानंतर ती कोरोनाची लस असल्याचे सांगून लसीकरण मोहीम राबवून लोकांची फसवणूक केली. लसीकरण केलेल्या लोकांना मुंबई मधील वेगवेगळया नामांकित हॉस्पिटलचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र देवून त्यांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. या आरोपीला कांदवली पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती बारामती पोसील ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली.