एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस अटक- विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे :एकतर्फी प्रेमाचा शेवट हा बऱ्याचदा गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचे दिसून येते. एकतर्फी प्रेमातून अनेकजणांनी आत्महत्या, खून केल्याचे आपण ऐकत असतो. खडकी पोलिसांनी नुकतेच अशाच एका घटनेत तपास करत खुन करुन पसार झालेल्या रिक्षा चालकास कर्नाटक येथून अटक केली आहे. पोलीसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नसिर बिराजदार याला कर्नाटक येथून अटक केली आहे.
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल :24 एप्रिल रोजी मयत महिला रजनी राजेश बेकेल्लु, वय ४४ वर्षे, रा. कुंदन कुशल सोसायटी, फ्लॅट नं. १९, तळमजला बोपोडी, ही महिला नोकरीकरीता त्यांचे मोपेड गाडीवर जात असताना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास स्टेशन हेडक्वार्टर रोड, खडकी पुणे येथे कोणतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणांवरुन तिच्या मानेवर व इतर ठिकाणी चाकूने वार करुन गंभीर जखमी करुन तिचा खुन केला, याबाबत खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महिलेवर एकतर्फी प्रेम :या गुन्ह्यातील आरोपीबाबत नातेवाईकांकडे अधिक तपास केला असता यातील मयत महिला ही स्टेशन हेडक्वॉर्टर, खडकी पुणे येथे नोकरीस होत्या. त्यांचा दोन वर्षापूर्वी अपघात झाल्याने तिने नोकरीकरीता येण्याजाण्याकरिता भाड्याने रिक्षा लावली होती, अशी माहीती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्याबाबत अधिक तपास करता रिक्षाचालक नसिर बिराजदार हा यातील मयत महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. त्यास मयत महिलेचा विरोध असलेने त्याच कारणांवरुन हा खुन केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीबाबत तांत्रीक तपास : आरोपी रिक्षाचालक याचा शोध घेत असताना आरोपीबाबत तांत्रीक तपास पोलिसांकडून सुरू होता. तेव्हा बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, आरोपी हा विजापुर, कर्नाटक येथे असून तो तिथे लपून बसला आहे. खडकी पोलिसांच्या पथकाने लगेच विजापुर कर्नाटक येथे जावुन आरोपीस शिताफिने ताब्यात घेतले. त्याला खडकी पोलीस स्टेशन येथे आणुन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक तपास केला. तेव्हा त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : Thane Crime : लग्नास नकार दिल्याच्या वादातून विवाहितेवर हल्ला! आरोपी नाशिकमधून घेतला ताब्यात