पिंपरी-चिंचवड(पुणे) - सोशल मीडियाचा वापर करून दहशत पसरवणाऱ्या आरोपीला गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कोयत्यासह स्वतः चा फोटो पोष्ट केला होता.
काय आहे प्रकरण?
कोयत्यासोबत फोटो घेतलेला आरोपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कोयत्यासह फोटो पोष्ट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने केली आहे. स्वप्नील गायकवाड हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचे कृत्य करायचा. त्याच्यावर एक चोरीचा गुन्हा दाखल असून, त्याचे भाई होण्याचे स्वप्न होते. यातूनच त्याने असे फोटो काढण्यास सुरुवात केली होती. मात्र, गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पुन्हा असा गुन्हा करणार नाही असे म्हणून त्याने हात जोडले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेडगे, विजय तेळेवार, शुभम कदम, रामदास मोहिते यांच्या पथकाने केली आहे.