पुणे- फरार असलेला सराईत आरोपीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो महाकाली टोळीतील सदस्य आहे. त्याच्याकडून 4 गावठी पिस्तुल आणि चार काडतुसे जप्त केली आहेत. सागर कुमार इंद्रा ( वय 27 वर्षे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत.
तो हडपसर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून हिंजवडीमधील अपहरणाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. त्यानुसार त्याचा शोध पोलीस घेत होते. तेव्हा, हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अतिक शेख यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, आरोपी सागर हा घोटावडे येथून हिंजवडीकडे येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदशनाखाली दोन पथक तयार करण्यात आले. हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. दरम्यान, एक दुचाकीस्वार संशयितरित्या आला, पोलिसांनी तो सागर असल्याचे ओळखले. मात्र, त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला. त्याचा फिल्मीस्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतले.